Home » रजा

रजा

by Govind Khamkar
0 comments

लेख 17 वा: रजा

ऑफिसमध्ये साहेबाला काम सुधरून देईना.. त्यात आठवड्याला 2-3 VC, वरच्या साहेबाच्या meeting, लोकांचे फोन, भानगडी, वरून शनिवार रविवार सुट्ट्या ,  शासकीय सुट्ट्या…कामाला वेळच मिळत नाही!!! साहेब पुरता जॅम झालेला…आणि त्यात पुन्हा कर्मचाऱ्यांच्या रजा!!!!

एकतर  साहेबाच्या ऑफिसला जरा कामाचे फक्त  दोन तीन कर्मचारी, त्यातले एक दोन  जण त्यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाच्या म्हणजे उदा. मेहुण्याच्या  चुलतसासुच्या पुतणीच्या लग्नाला जाण्यासाठी रजेवर… !! ,

साहेबाला लोकांच्या रजा काय सुधरून देत नाही!! त्यात या पाच दिवसाच्या आठवड्याने साहेबाची सगळी बोंब केली…सुट्टीदिवशी साहेब सोडून कुणीच मुख्यालयाला सापडत नाही! आणि आजकाल whatsapp च्या अतिरेकामुळे शनिवार रविवारी असो की शासकीय सुट्टी,  पण कार्यालय अघोषितरीत्या सुरुच असतंय….त्यात अमुक माहिती दोन  तासात पाठवा वगैरे असल्या message आले तर साहेबाचं डोकं जॅम होतंय…अशा वेळी  आता कोणाला ऑफिसला बोलवावं, कोण जास्त  नाटकं न करता येईल याच calculation करून साहेब कोणालातरी येऊन माझ्यावर उपकार कर या भावनेने बोलवत असतो..  तरीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात रजा हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असतो…

घरापासून बऱ्यापैकी  दूर कार्यरत असणारे म्हणजेच चक्राकाराच्या चक्रव्यूहात अडकल्याने  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  टाकलेले तथा फेकलेले अधिकारी शक्यतो  wholesale रजा घेतात. चक्राकाराचं  चक्रव्यूह सदैव भेदण्याची ‘कला’ प्राप्त झालेले साहेब सदैव योग्य ठिकाणी पोस्टिंग घेऊन  आयुष्याचा बहुतांशी  प्रवास किरकोळ रजेवरच करतात…

घरापासून जरा दूर असलेले साहेब नुसते   calender मध्ये लाल भडक तारखा शोधत असतात. . अशा साहेबाना कॅलेंडरमधील सुट्टीच्या   तारखांचा रंग लाल भडक करण्याचे प्रयोजन काय असेल हे लक्षात येत नाही, किमान शासकीय calender मध्ये तरी त्यांचा  रंग हिरवा अथवा प्रेमळ गुलाबी करायला काय हरकत आहे अशी यांची धारणा असते( कदाचित सरकारी कार्यालयात ज्या जनतेची  कामे pending आहेत त्यांच्यासाठी calender मधील शासकीय सुट्ट्यांच्या रंग लालभडक असावा!!).  मग आठवड्यातील एक दोन  लालभडक तारखा दिसल्या की साहेब आनंदित होतो… मग लगेच ती लालभडक तारीख आणि शनिवार रविवार यादरम्यान किरकोळ रजेच  फुल अलगदपणे   माळून साहेब सुट्टीवर जातो.!! किरकोळ रजा किती घ्यायच्या हे नियमात असलं तरी त्या मोजायच्या नसतात ही धारणा सर्व शासकीय कार्यालयांनी पक्की केलेली आहे., त्यामुळे  वर्षभरात 5-25 किरकोळ रजा घेणारे बरेच तज्ञ साहेब आणि कर्मचारी कार्यालयात असतात. किरकोळ रजा म्हणजे फारच किरकोळ हो!!!  किरकोळ रजेचा अर्ज सुद्धा बरेच कर्मचारी A4 size चा कागद निम्मा फाडून त्यावर करतात.. काही कार्यलयामध्ये सर्व कर्मचारी संगनमताने किरकोळ रजेचे अर्ज दुसऱ्या दिवशी काढून गायब करून टाकतात!!!

याच्या पुढचं version म्हणजे विनातारखेचा अर्ज सदैव देऊन ठेवायचा, एखादा मोठा साहेब चुकून हुकून  अचानक भेट द्यायला आला तर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याचा हितचिंतक कर्मचारी  तत्परतेने त्या अर्जावर  त्यादिवशीची तारीख टाकून मोकळा होतो!!! 

रजेमध्ये पण सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे medical leave !! हे तर अवघड जागेवरच दुखणं आहे…साहेबाला अशा रजा इच्छा नसताना द्याव्या लागतात, त्यात पण त्या रजा genuine असेल तर ठीक नाहीतर काहीजण timing साधून आजारी पडतात, कुठून तरी certificate घेऊन येतात… मग साहेब check mate होतो…

सगळ्यात हास्यास्पद प्रकार म्हणजे जे प्रामाणिकपणे त्यांच काम पार पाडतात त्यांना रजा मिळत नाही आणि बिनकामाच्याना वरचा साहेब मनमोकळेपणाने रजा देऊन टाकतो… असल्या बिनकामच्यांवर साहेब कधी कधी एवढा ‘मेहेरबान’ होतो की त्यांना सक्तीच्या रजेवर सुद्धा पाठवतो!!!

साहेब जेंव्हा नवीन असतो तेंव्हा खालचे कर्मचारी अगदी शनिवारी रविवारी,सुट्टीच्या दिवशीसुद्धा   साहेबाला विचारून गावी वगैरे जातात! साहेब जरा जुना झाल्यानंतर मात्र टपालात परस्पर अर्ज टाकून गायब होण्याची प्रथा रुजू लागते. कधी कधी तर एखादा कर्मचारी रजेवर जाऊन 4-5 दिवसांनी माघारी येतो, त्यानंतर त्याच्या रजेचा अर्ज साहेबाच्या हातात पडतो, तेंव्हा साहेबाला समजत की  हा रजेवर गेला होता, गतिमान प्रशासन!! 

रजेसाठी कोणतं कारण दिलं पाहिजे म्हणजे साहेब रजा मंजूर करेल याचा अभ्यास अधिकारी कर्मचारी करत असतात. काही कर्मचारी तर  या रजेपायी कित्येक जवळचे, दूरचे नातेवाईक बिनधास्त scheme लागल्यासारखे मारून टाकतात!!! काही already मेलेले असतील त्यांना पण मरण्याचा second chance देऊन  टाकतात…कधी कधी साहेब विचार करतो याचे एवढे नातेवाईक मेले तरी अजून शिल्लक कसे!!

साहेबाकडे कोणी रजा मागायला आला तर साहेब आपलं उगाच त्याला विचारणार कशाला पाहिजे रजा ,इतके दिवस कशाला पाहिजे, एवढेच दिवस रजा घ्या.. पण साहेबाच्या असल्या dialogue चा काहीच उपयोग होत नाही, कर्मचारी जेवढी रजा घ्यायची तेवढी घेतोच!!! पण याच्या अगदी उलट अस की साहेबाला त्याच्या वरच्या साहेबाकडून रजा मंजूर करायला प्रचंड मेहनत करावी लागते..बऱ्याचदा साहेबाला वेळेवर सुट्टी मिळत नाही, साहेबाला वाटतं मी  कर्मचाऱ्यांना जशा  रजा  देतो तशा  त्याला त्याच्या साहेबाने दिल्या पाहिजे!!   स्वतः साहेब कितीही बेजबाबदार असला तरी तो स्वतःला जबाबदार समजत असतो आणि त्या दडपणाखाली तो स्वतःच रजा घेण्याचं बऱ्याचदा टाळतो!!

बरं साधारणवेळी रजेवर गेलं तर ठीक पण 

कधी कधी अधिकारी कर्मचारी एकदम timing साधून रजेवर जातात, म्हणजे भरपूर pendency झाली की रजा, एखादं क्लीष्ट भानगड समोर येणार आहे असं समजलं की रजा, वरचा साहेब रजेवरून आला की तो पुन्हा हात धुऊन काम करण्यासाठी मागे  लागणार म्हणून रजा वगैरे वगैरे, अशा वेळी साहेब पार हतबल होऊन जातो… सगळ्यात वाईट म्हणजे वरचा साहेब सारखा फोन करून progress विचारत राहतो(दुसरं तो तरी काय करणार!!) आणि खालच्या  साहेबाची so called यंत्रणा (आपल्याकडील त्रोटक ,अकुशल मनुष्यबळाला यंत्रणा का म्हणतात हे साहेबाला अजून समजलेल  नाही!  किमान एकाच पाण्यातील माशांनी अशी ‘यंत्रणा’ म्हणून थट्टा करू नये असे साहेबाला वाटत असते) म्हणजे कामाचे एक दोन कर्मचारी रजेवर गायब… साहेबाला हे सांगायची तर सोयच नाही की अमुक व्यक्ती रजेवर असल्याने मला अडचण येत आहे वगैरे… आणि जर चुकून साहेबाने वरच्या साहेबाला सांगितलच की अमुक व्यक्ती रजेवर आहे तर वरचा साहेब त्याला ‘ तुमची बाकीची यंत्रणा कामाला लावा’ असला dialogue मारून मोकळा होतो… साहेब पण Yes Sir म्हणतो!!

काही काही साहेब  तर अद्भुत असतात, ते रजाच घेत नाहीत! अगदी शनिवार रविवारी पण हे  कामावर!! म्हणजे अस काय ‘समाधान’ त्यांना यातून लाभत याचा शोध घेतला पाहिजे..असले  साहेब retirement नंतर वेळ कसा घालवतात हे पण  पाहिलं पाहिजे..काही काही साहेब सेवनिवृत्तीच्या आधी 5-10 वर्षे जरा कमी सुट्ट्या घेऊन रजा रोखीकरनाचा लाभ मिळवतात आणि 5 वर्षे लवकर मरतात!! 

बरं  चुकून साहेबाला रजा मिळाली आणि साहेब रजेवर गेला तरी आज काल social media चा अतिरेक एवढा वाढलाय की साहेबाला office चे phone सुधरून देत नाही!!साहेब रजा घेऊन कुठं फिरायला गेला तरी या फोनमुळे तिथंच ऑफिस सुरू होऊन जातं!!  फिरायला नेलेली बायका पोरं साहेबाच्या फोनला वैतागून जातात..( हे प्रकरण साहेबाने कौशल्याने हाताळले नाहीतर जड जाऊ शकते !!)…

काही खाजगी अस्थापणामध्ये कर्मचाऱ्यांच  मानसिक संतुलन चांगलं राहावं यासाठी त्यांना compulsory  रजा दिली जाते, शासनाकडून एवढी  नाही पण किमान गरजेच्यावेळी हक्काने रजा मिळावी एवढी अपेक्षा!!!

क्रमशः

©गोविंद खामकर

(टीप: यापूर्वीचे सर्व 16 लेख  https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत

#साहेब सिरीज)

सदरील लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने व सर्व अधिकारी ,कर्मचारी, संघटना यांच्याशी संपूर्ण आदर बाळगून लिहिला आहे तसेच हे लिखाण अत्यंत मर्यादित व अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12640

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy