Home » मामाचं पत्र हरवलं…

मामाचं पत्र हरवलं…

by Govind Khamkar
0 comments

मामाचं पत्र हरवलं…

शासनामध्ये टपालातुन पत्र वेळेत येईल असे कोणत्याच साहेबाला  वाटत नाही..हे एकमेकांच्या  कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यतत्परतेवर असलेल्या प्रचंड विश्वासाच प्रतीक आहे.. सामान्यपणे एखाद पत्र साहेबाला त्या पत्राचा उगम झाल्यापासून पंधरा  दिवसांनातर हातात येत… त्या पत्रात लिहिलेले असतंय तीन  दिवसात अहवाल सादर करावा, विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, किंवा हे अतिशय गंभीर आहे, आपण व्यक्तिशः लक्ष घालावे, तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी,अर्जदाराला  परस्पर तुमच्या स्तरावरून कळून टाकावे इकडे कळवू सुद्धा  नये वगैरे वगैरे…..आता पत्रच  15 दिवसांनी आल्यावर कधी अहवाल आणि कधी कार्यवाही  ..असो.  एरव्ही ही तर  फॅशनच झाली आहे, सर्वस्वी जबाबदारी आपली राहील हे प्रत्येक पत्रात नमूद असतंय.. हे असले पत्र  काढनाऱ्या साहेबांवर नेमकी कोणती जबाबदारी असते ते पण पाहिलं पाहिजे, कारण नुसते पत्र काढायला शक्यतो शासन एवढा पगार देणार नाही असं वाटतं(देऊ पण शकत, त्यात काय एवढं)!! 

एखादं पत्र वरच्या साहेबाच्या ऑफिसमधून  type झाल्यापासून तर ते Target तथा  खालच्या साहेबाच्या हातात(कार्यलयात नाही!!)  पडेपर्यंतच प्रवास फारच रोमांचक असतो… या पत्राचा प्रवास टपाल कक्षातील  अतिकार्यक्षम कर्मचार्यांमुळे अजून खडतर होतो!! एक तर ते पत्र type करणारा दिवसभरात एकच पत्र करतो.. इतर उर्वरित तथा फावल्या वेळात 5-25 चहा, गप्पाटप्पा , फरक, इनक्रिमेंट, शेती,प्लॉटिंग आणि इतर राष्ट्रीय विषयावर चर्चा…. मग ते पत्र साहेबाच्या टेबल वर 2-4 दिवस कोंबड्याच्या प्रतीक्षेत!! 

साहेबांच्या कोंबडा तथा स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर जावक नंबर टाकून अथवा असाच  फेकून ते टपाल  कक्षात जाणार…. साहजिकच टपाल कक्षात   त्यावर प्रचंड विचारमंथन, चर्चा, आणि अंतिम  निर्णय घेणे  ही खूपच किचकट प्रक्रिया असल्याने या ठिकाणी घाई करून जमतच नाही!!!  या ठिकाणची छोटीशी चूक सुद्धा परभणीचे पत्र जर्मनीला पाठवू शकते वगैरे वगैरे….त्यात पुन्हा टपाल कक्षातील कर्मचारी हे अतिशय सामाजिक बांधिलकी जपणारे  असल्याने त्याना सर्व वाढदिवस,  आजारी पाहुण्याला भेटायला जाणे, मित्राच्या मुलाला मुलगी पाहायला जाणे, सुपारी, साखरपुढे, दहावे, सदिच्छा भेटी, देवदर्शन, नवस, चुलत मेहुण्याच्या चुलत सासुच्या चुलत पोराचं लग्न वगैरे वगैरे  हे अटेंड करावेच लागतात. त्यामुळे त्या पत्राला तिथून निघण्यास उशीर झाला तर त्यात एवढं काय नवल आहे? त्यानंतर ते  पत्र खालच्या ऑफिस च्या शिपाईसाहेबांच्या प्रतीक्षेत … खालच्या ऑफिस चे शिपाई साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते पत्र खालच्या साहेबाच्या टपाल कक्षात पोहच करतात… साहजिकच इथे सुद्धा अत्यंत अनुभवी (काहींनी तर आयुष्य टपाल कक्षात काढलय!)  दद्धाचार्यांच्या हातून ते थोडंच अस न तपासता जाणार आहे!!!

तिथं त्याची आवक रजिस्टर ला सांकेतिक  भाषेत( ही एक आवक जावक कक्षातील code language आहे, ही जो लिहितो त्यालाही शक्यतो वाचता येत नाही, बाकीच्यांचा तर विषयच नाही!! ) नोंद घेऊन ते पुढे साहेबांकडे जायला तयार…मग कार्यालयातील एखादा कर्मचारी ते पत्र marking करून(खरं तर पत्र साहेबाने मार्क केलं पाहिजे पण… साहेब..शेवटी साहेबच!!.. आता अजून काय बोलणार!) पुढे त्यासंबंधी टेबल वर शिपाईसाहेबामार्फत पाठवतो…एवढं सगळं systematic  जंजाळ असताना पत्र उशिरा पोहचणे  समजू शकतो पण पत्र न सापडणे हा गंभीर प्रकार शासकीय कार्यालयात नेहमीचाच.!!.. मी काही दिवस मंत्रालयात काम केलं , तिथपासून तर फील्डवरील सगळ्या कार्यालयात हीच बोंब…. साहेबाकडे येणारे अभ्यागत तथा पत्रकार, लाभार्थी, कार्यकर्ते,  कार्यालयाच्या अवती भवती कायम पडीक दिसणारे एखादा कागद घेऊन येतात, त्यावर साहेबाच्या कार्यालयाची पोहच असते…साहेबाने तो कागद पाहिलेला नसतोच(अगदी नेहमीप्रमाणे!)..मग साहेब संबंधित टेबल वरच्या कर्मचाऱ्याला बोलावतो… साहजिकच नेहमीप्रमाणे  तí#2379; पण म्हणतो त्यानेही तो कागद पाहिलेला नाही…मग कागद गेला कुठं??  साहेब चिडचिड करायला लागतो, तस सगळे तो कागद सापडवण्याचा प्रयत्न करतात अथवा किमान तस भासविण्याचा तरी प्रयत्न करतात, कागद  काय सापडत नाही…. बरं हे  नेहमी असंच!!!

पण साहेबाला काय मेळ लागत नाही कागद जातेत तरी कुठं!! कधी कधी तर साहेबाला वाटत सरसकट सगळ्यांच्या सोनोग्राफया तरी करून पहाव्या , कोण कागद खात बित तर  नाही ना हे तर समजेल!!….. पण आता साहेबाने याला तोडगा काढला…जो व्यक्ती ती पोहच घेऊन येतो त्याचीच झेरॉक्स काढायची आणि तिथून पुढे त्या कागदावर काम सुरू करायचं(हे तत्व मंत्रालयापासून तर सगळ्यात खालच्या ऑफिस पर्यंत लागू आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय)!! 

पण आता लोक पण हुशार झालेत, ते पत्रावर पोहच घेऊन 8 दिवसांनी माहिती अधिकारात विचारतात की अमुक अमुक तारखेला दिलेल्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील द्यावा. मग आता काय शोधणार… कुठं  शोधणार…शोधून तरी काय होणार…!!!

…बरं  ज्या पत्रांचा उगम साहेबाच्या ऑफिस मध्ये होतो तिथं पण तीच बोंब!! जर साहेबाला असं वाटलं की एखादा फील्ड वरील कर्मचारी कामाकडे फारच दुर्लक्ष करतोय(थोडफार  चालतय!) तर साहेब त्याला नोटीस काढतो, पण नोटिसला उत्तर सुद्धा येत नाही, मग साहेब दुसरी नोटीस काढतो, तिला पण उत्तर येत नाही, साहेबाला त्या कर्मचाऱ्याच्या मुजोरपणाचा खूप  राग येतो मग साहेब प्रथेनुसार तिसरी आणि अंतिम नोटीस काढतो( तीन नोटीस देण्याची प्रथा आहे, नियम नाही)…पण त्याला पण उत्तर नाही… त्यांनतर 2-3 दिवसांनी योगायोगाने नोटीस दिलेला कर्मचारी दुसऱ्या  कामानिमित्त साहेबांकडे येतो… साहेबाला तो एकदम chill दिसतो, नोटिसचा लवलेशसुद्धा चेहऱयावर नाही!!! मग साहेब आवक जावक विभागातील तज्ञ कर्मचाऱ्याला बोलावतो…. तिन्ही नोटीस त्याच्याकडेच पडलेल्या!!!!  बरं त्याला बोलून काय फायदा.. तो बऱ्याच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर घसरलेला असल्याने कमालीची स्थितप्रज्ञता त्याच्या अंगी असते, काही बोला, फरकच नाही..असो!!

हे झालं कागदी घोड्यांचं..

Email च तर लै अवघड…इकडचे म्हणणार पाठवला, तिकडले म्हणणार आला नाही… मग एकच तोडगा…पुन्हा पाठवा!!…मग  येतो बरोबर.!!…हे कसं काय होत ते त्या सुंदर पिचाईलाच माहिती..आम्ही असलं एकदा Engineering च्या पहिल्या वर्षात 2006 साली केलं होतं, फोन करून विचारल होत email आला का… पण 2021 मध्ये तरी हे थांबलं पाहिजे!!…..

लहानपणी एक खेळ खेळायचो….. मामाच पत्र हरवलं… ते कोणाला सापडलं….आता समजतंय तो मामा साहेब होता!!!!

(काही शासकीय कार्यालयातील कर्मचारी  टपाल कक्षामध्ये अत्यंत चांगलं काम करीत आहेत, काही ठिकाणी ई टपाल पद्धती  सुद्धा चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे..हे लिखाण अगदी अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे, जरी कोणाला वाटलं की हे माझ्या ऑफिसशी match होतंय त्यांनी सुधारणा करावी, इलाज नाही)

सदरील लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने व सर्व अधिकारी ,कर्मचारी, संघटना यांच्याशी संपूर्ण आदर बाळगून लिहिला आहे तसेच हे लिखाण अत्यंत मर्यादित व अपवादात्मक अनुभवावर आधारित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
12643

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy